युनायटेड वी स्टँड फाउंडेशन आणि नाशिक प्लॉगर्स या स्वयंसेवी संस्था तर्फे महिला दिन साजरा. महिला सक्षमीकरणासाठी आयोजित हा कार्यक्रम, "महिलांमध्ये गुंतवणूक करा : वाढीचा वेग वाढवा" या मुद्द्यावर केंद्रीत होता. पर्यावरणीय जबाबदारीचे पालन, तसेच आपल्या समाजात असणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार व त्यांचे मनोगत जाणून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पर्यावरणीय शाश्वतता आणि महिला केंद्रित विकास या दोन्ही तत्त्वांची उदाहरणे कार्यक्रमात दिली गेली. विविध क्षेत्रांना गवसणी घालणाऱ्या महिला वक्त्यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्रीमती दिपाली चांडक, सी.ए. रश्मी लोणीकर, रिया पंजवानी, कॅप्टन अनुश्री वर्मा, अक्षता देशपांडे या प्रेरणादायी महिलांनी त्यांच्या प्रवासाची झलक आणि यशाच्या पथावर चालतांना आलेल्या अडचणींवर केलेली मात याबद्दल सांगून श्रोत्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा जागृत केली. या शिबिरात ३५ जागरूक नागरिकांनी आपले रक्त दान केले. विशेष अतिथींसह ३५ महिला प्लोगर्स आणि ३५ UWS स्वयंसेवकांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.